विधानसभा निवडणूकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर
23 नोव्हेंबर रोजी होणार मतमोजणी
परभणी, दि. 16 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार परभणी जिल्ह्यातील जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या 4 विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान तर शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीची परभणी जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांच्यासह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हा निवडणुक अधिकारी श्री. गावडे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषित केला आहे. परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदार संघासाठी निवडणुकीची अधिसूचना मंगळवार, 22 ऑक्टोबर, 2024 रोजी प्रसिद्ध होईल. उमेदवारांना नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक मंगळवार, 29 ऑक्टोबर, 2024 असा आहे. नामनिर्देशनपत्राची छाननी बुधवार, दिनांक 30 ऑक्टोबर, 2024 रोजी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस सोमवार, दिनांक 4 नोव्हेंबर,2024 आहे. या निवडणूकीसाठी बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होईल तर शनिवार, 23 नोव्हेंबर, 2024 मतमोजणी होईल. तर सोमवार, 25 नोव्हेंबर, 2024 रोजी निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. परभणी जिल्ह्यात जिंतूर, परभणी, गंगाखेड, पाथरी या 4 विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे.
परभणी जिल्ह्यात 15 ऑक्टोबर, 2024 पर्यंत 95-जिंतूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 98 हजार 932 पुरुष, 1 लाख 86 हजार 440 महिला, 11 तृतीयपंथी असे 3 लाख 85 हजार 383 मतदारांची संख्या आहे. 96-परभणी विधासभा मतदारसंघात 1 लाख 77 हजार 789 पुरुष, 1 लाख 70 हजार 372 महिला, 11 तृतीयपंथी असे 3 लाख 48 हजार 172 मतदारांची संख्या आहे. 97-गंगाखेड विधानसभा मतदारसंघात 2 लाख 17 हजार 169 पुरुष, 2 लाख 01 हजार 997 महिला, 5 तृतीयपंथी असे 4 लाख 19 हजार 171 मतदारांची संख्या आहे. 98-पाथरी विधानसभा मतदारसंघात 2 लाख 01 हजार 824 पुरुष, 1 लाख 88 हजार 721 महिला, 2 तृतीयपंथी असे 3 लाख 90 हजार 547 असे एकूण 15 लाख 43 हजार 273 मतदार आहेत.
परभणी जिल्ह्यात सेना दलातील 1 हजार 178 मतदार आहेत. तर 85 वर्षावरील वयोगटातील मतदारांची संख्या 24 हजार 343 इतकी असून जिल्ह्यात 7 हजार 811 इतके मतदार हे दिव्यांग आहे. आवश्यकतेनुसार त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेटची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच मतदान केंद्रावर त्यांच्या सोईसाठी आवश्यक उपाययोजना केल्या आहेत. जिल्ह्यात 1 हजार 623 मतदान केंद्र असून आयोगाच्या सूचनानुसार 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकॉस्टिंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. जिल्ह्यात 6 मतदान केंद्र हे संवेदनशील आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सेक्टर अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली असून बैठे व फिरते पथक कार्यान्वित करण्यात येत आहे.
जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. आदर्श आचारसंहितचे अनुषंगाने शासकीय जागेवरील बॅनर, पोस्टर काढण्यात येवून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यावर्षी मतदानांची टक्केवारी वाढविण्यासाठी स्वीपद्वारे मोठ्या प्रमाणात जिल्हाभरात विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी, कर्मचारी यांना पोस्टल बॅलेटद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध आहे. व्होटर हेल्प लाईनद्वारे मतदारांना मतदानाचे दिवशी ऑनलाईन पध्दतीने आपले नाव कोणत्या मतदान केंद्रावर आहे त्याबाबत माहिती मिळविण्यासाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा. सी -व्हिजल ॲपद्वारे नागरीक आचारसंहिता भंगाची तक्रार करु शकतात. तर केवायसी ॲपद्वारे नागरिकांना निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची सर्व माहिती जाणून घेता येणार आहे. तर राजकीय पक्ष व उमेदवारांना विविध परवानगीसाठी सुविधा अॅप द्वारे उमेदवार विविध परवानगी मागू शकतात. मागील निवडणुकीत ज्याठिकाणी कमी मतदान झाले होते, अशा ठिकाणी मेळावे, कार्यक्रम, पथनाट्य, शाळा व कॉलेजमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी नागरिकांनी भयमुक्त वातावरणात मतदान करावे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले.
—–