जिंतूर प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागामार्फत प्रशासन अधिक लोकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर” बामणी मंडळात दिनांक २० मार्च रोजी ग्रामपंचायत कार्यालय बामणी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
उपविभागीय अधिकारी सेलू मा. शैलेश लाहोटी यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिंतूरच्या तहसीलदार मा. शितल कच्छवे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार प्रशांत राखे, तालुका कृषी अधिकारी नितीन घुगे, उपसरपंच सुनीताबाई जाधव (बामणी), सरपंच सावित्रीबाई घोगरे (करंजी), उपसरपंच नारायण राठोड (असोला), सरपंच लक्ष्मीबाई जाधव (अंगलगाव) तसेच सरपंच भीमराव वाकळे (पिंपळगाव काजळे) उपस्थित होते.
यावेळी बामणी मंडळाच्या मंडळ अधिकारी श्रीमती आरती शेळके, सर्व ग्राम महसूल अधिकारी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
शिबिरामध्ये नागरिकांना विविध महसूल सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आल्या. यामध्ये प्रमाणपत्रे व विविध दाखले, ७/१२ व ८-अ उतारे, फेरफार प्रकरणे, नोंदीतील चुका दुरुस्ती, जमीन अभिलेख अद्ययावत करणे तसेच अकृषिक (NA) संदर्भातील मार्गदर्शन यांचा समावेश होता. तसेच जमीन विषयक प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यात आला.
यासोबतच नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती देत सामाजिक योजनांचा लाभ, ई-मोजणी अर्ज प्रक्रिया, तसेच पी.एम. किसान नोंदणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात आरोग्य, कृषी, मुद्रांक व नोंदणी, पुरवठा आदी विभागांनी स्वतंत्र माहिती कक्ष उभारून नागरिकांना सविस्तर माहिती दिली. तहसीलदार शितल कच्छवे यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत नागरिकांना त्याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
या शिबिराला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विविध सेवांचा लाभ घेतला. एकूणच हा उपक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.



